समुद्राने विभक्त केलेली होडी.

            समुद्राने विभक्त केलेली होडी.
भर मायेच्या सागरात ती होडी जणू एकटीच पाण्यावर तरंगत होती.
मी क्षणभर सागरकिनारी उभी राहून तिचं निरीक्षण करत होते.
का बरं ही अशी एकटी?
ती होडी जणू तिच्या हरवलेल्या प्रेमाची वाट पाहत होती.
कुठे गेलं असेल तिचं प्रेम—
तिला एकटीला खोल समुद्रात दफन करून?
कोणास ठाऊक…
तेवढ्यात मला जाणवलं—
मानवजात जशी आपल्या आवडत्या व्यक्तीला
न सांगता, न कळवता सोडून निघून जाते,
तशीच ही होडीसुद्धा सोडून दिली गेली आहे.
एकदा आपलाच माणूस कंटाळला की
तो आपोआप निघून जातो.
मग ती होडी असो
की एखादी मुलगी…
पण सोडून जाणाऱ्याला काय कल्पना,
मागे राहून वाट पाहणाऱ्याला
किती वेदना सहन कराव्या लागतात.
तरीही ती होडी
एक आशा धरून बसली आहे.
पण कसली आशा?
हरवलेलं प्रेम परत येण्याची
की विजेसारख्या धावत येणाऱ्या लाटांची?
पण ही आशा किती दिवस टिकणार?
तो गार पाण्याचा स्पर्श
तिला हळूहळू थकवत आहे…

समुद्रकिनाऱ्यावरील अंधार, किड्यांचा आवाज, उंच आणि धोकादायक लाटांचा गडगडाट, वेगवान वारा आणि त्यातच माझे अश्रू मला आतून संपवत आहेत; हे सर्व मला समुद्राच्या खोलवर घेऊन जाण्यापूर्वी तू ये आणि मला वाचव. माझ्या मनात अजूनही आशा जिवंत आहेत आणि माझ्या डोळ्यांतील विश्वास पाण्यातून माझ्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये तुला शोधत आहे.

Comments

Popular Posts